बिजगर्णीत कर्तृत्वाचा गौरव; पत्रकार निलेश मोरे, नागेश कांबळे यांचा सत्कार
बिजगर्णीत कर्तृत्वाचा गौरव; निलेश मोरे, नागेश कांबळे यांचा सत्कार बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे तिरंगा युवक मंडळासह विविध युवक मंडळे व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. दै. तरुण भारतच्या डिजिटल मीडिया विभागातील पत्रकार निलेश मोरे यांना ‘बेस्ट एम्प्लॉयी’ पुरस्कार

बिजगर्णीत कर्तृत्वाचा गौरव; पत्रकार निलेश मोरे, नागेश कांबळे यांचा सत्कार
युवक मंडळे व ग्रामस्थांचा संयुक्त उपक्रम; मान्यवरांकडून कार्याचा गौरव
बेळगाव
समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावात नुकताच विशेष सत्कार समारंभ पार पडला. यावेळी दै. तरुण भारतच्या डिजिटल मीडिया विभागातील पत्रकार निलेश मोरे यांना ‘बेस्ट एम्प्लॉयी’ पुरस्कार मिळाल्याबद्दल, तर खासगी शाळेत प्रदीर्घकाळ शिपाई म्हणून सेवा बजावून निवृत्त झालेले नागेश कांबळे यांचा त्यांच्या सेवाकार्याबद्दल गौरव करण्यात आला.
बिजगर्णी येथील तिरंगा युवक मंडळ, ग्रामस्थ मंडळ, विकास युवक मंडळ, ब्रह्मलिंग युवक मंडळ आणि ग्रामस्थ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील गुणवंत, कर्तृत्ववान आणि प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
दै. तरुण भारतच्या डिजिटल मीडिया विभागात पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या निलेश मोरे यांना त्यांच्या कामातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘बेस्ट एम्प्लॉयी’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक, कृषी तसेच विविध स्थानिक प्रश्नांना माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याच्या कार्याबद्दल यावेळी त्यांचे कौतुक करण्यात आले.
नागेश कांबळे यांनी खासगी शाळेत शिपाई म्हणून अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली. आपल्या सेवाकाळात जबाबदारीने काम करून निवृत्त झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ सेवेला अभिवादन करण्याच्या भावनेतून करण्यात आलेला हा सत्कार विशेष ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुंडलिक जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी तालुका पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा बेळगावकर होते. व्यासपीठावर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष तथा सदस्य मनोहर बेळगावकर आणि माजी कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष निंगाप्पा जाधव उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या यशामागील मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणाचे कौतुक केले. गावातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान हा केवळ व्यक्तीचा गौरव नसून, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेणाऱ्या नव्या पिढीचा उत्साह वाढविणारा उपक्रम आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी मारुती जाधव, मनोहर पाटील, सुरेश कांबळे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष महेश पाटील, जोतिबा पाटील, विनोद जाधव, भाऊकू तारिहाळकर, संतोष कांबळे,
बबलू नावगेकर , परशराम बेर्डे , सुरेश कांबळे, अशोक कांबळे, मनोहर पाटील, मोहन सावी , यल्लाप्पा पेडणेकर, मारुती हलकर्णीकर संदीप कुलकर्णीकर,
सागर नाईक, सोमनाथ बेळगावकर यांच्यासह ग्रामस्थ, युवक मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात दोन्ही सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामस्थांच्या आपुलकीने आणि युवक मंडळांच्या पुढाकाराने झालेला हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.









