मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षणाची नवी दिशा!
केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाडला लॅपटॉपची अनोखी भेट; लक्ष्मण मनवाडकर यांच्या प्रयत्नांना यश
कोवाड : इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना आकर्षित करत असताना, मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि त्यांची संगणकीय साक्षरता वाढावी, या उद्देशाने केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. शिवसेना नेते व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मनवाडकर यांच्या प्रयत्नांतून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना संगणक आणि डिजिटल शिक्षणाची ओळख होणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. संजीवनी भोगण होत्या. वसंत पाटील सर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण मनवाडकर यांनी या उपक्रमामागे गजानन पाटील (कालकुंद्री) यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. सचिन जयसिंग पाटील (पुणे) यांच्या माध्यमातून हे लॅपटॉप शाळेला उपलब्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. गजानन पाटील हे शाळेच्या विकासासाठी सातत्याने प्रोत्साहन देत असल्याचे सांगून शाळेतील स्वच्छतागृहाचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘मराठी शाळा टिकवूया, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला बळ देऊया!’ असे आवाहन करत मनवाडकर यांनी परिसरातील पालकांनी आपल्या पाल्यांना हक्काच्या आणि मोफत शिक्षण देणाऱ्या मराठी शाळेत प्रवेश द्यावा, असे सांगितले. याच मराठी शाळांमधून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी अधिकारी, सैनिक, डॉक्टर, पोलीस अधिकारी आणि शास्त्रज्ञ बनले आहेत. त्यामुळे मराठी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
गजानन पाटील यांनी आपल्या मनोगतात पालकांना मार्गदर्शन केले. मुलांना चांगले शिक्षण देऊन हुशार बनवायचे असेल, तर त्यांना अनावश्यक मोबाईल वापरापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांच्या दैनंदिन कृतींकडे लक्ष देऊन त्यांच्यात अभ्यासाची आवड आणि चांगल्या सवयी निर्माण कराव्यात. शिक्षण हा प्रगतीचा मूलभूत पाया असून, त्याचे महत्त्व मुलांना लहानपणापासून समजावून सांगावे, असे त्यांनी आवाहन केले.
यानंतर लक्ष्मण मनवाडकर आणि गजानन पाटील यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडे लॅपटॉप सुपूर्द करण्यात आले. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिकण्याची, संगणक हाताळण्याची आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुधीर जाधव, राम पाटील, विनोद जाधव, समीर खानापुरे, प्रियंका जाधव, राजश्री पाटील, शुभांगी कुंभार यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होता.
सुविधांच्या अभावामुळे ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांचे डिजिटल शिक्षण मागे राहू नये, यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज आहे. मराठी शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि मराठी शाळा सक्षम करण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळेल.










