कोवाडमध्ये भव्य क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा!
क्रीडा संकुलासाठी शासनाकडून २० एकर जागा मंजूर; ग्रामीण खेळाडूंना आधुनिक सुविधांचे व्यासपीठ मिळणार

कोवाड :कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोवाडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण खेळाडूंसाठी भव्य आणि अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाकडून कोवाड येथे २० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या क्रीडा संकुलाच्या उभारणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
ग्रामीण भागात कुस्ती, कबड्डी, खो-खो, ॲथलेटिक्स यांसह विविध खेळांमध्ये गुणवत्ता असलेले अनेक खेळाडू आहेत. मात्र, आधुनिक प्रशिक्षण सुविधा, सरावासाठी मैदान आणि आवश्यक क्रीडा साधनसामग्रीच्या अभावामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रस्तावित क्रीडा संकुलामुळे या खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
विशेषतः कुस्तीची समृद्ध परंपरा असलेल्या कोवाडमध्ये आधुनिक कुस्ती प्रशिक्षणाची सुविधा निर्माण झाल्यास परिसरातील नवोदित मल्लांना त्याचा फायदा होणार आहे. याशिवाय विविध क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण आणि स्पर्धांच्या आयोजनाची संधी उपलब्ध होऊ शकते.
चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या क्रीडा विकासासाठी क्रीडा संकुल उभारण्याची मागणी यापूर्वीही पुढे आली होती. त्यासाठी ५० एकर जागेची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती. आता शासनाकडून २० एकर जागा मंजूर झाल्याने प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
मात्र, जागा मंजुरीनंतर आता प्रत्यक्ष निधी, आराखडा आणि बांधकामाची प्रक्रिया कधी सुरू होते, याकडे खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.









