दूंडगे-कोवाड हद्दीत बिबट्यासदृश्य प्राण्याचे दर्शन?
बसवाना मंदिर परिसरात हालचालींची चर्चा; शेतकरी, विद्यार्थी आणि पहाटे फिरायला जाणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा

कोवाड (ता. चंदगड) परिसरातील नागरिकांनो, सावधान! दूंडगे-कोवाड मार्गावरील बसवाना मंदिर परिसरात बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याची माहिती समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सुगीच्या दिवसांत शेतातील कामांची लगबग सुरू असताना वन्यप्राण्याच्या संभाव्य वावरामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
बसवाना मंदिर परिसरात बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याची चर्चा असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी एकट्याने जाणे टाळावे. शेतात जाताना शक्यतो समूहाने जावे. ऊसशेतीमध्ये पाणी पाजण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. कॉलेजला जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच महिलांनी निर्जन रस्त्यांवरून एकट्याने प्रवास करणे टाळावे.
ऊसशेती आणि दाट झाडीमध्ये वन्यप्राणी लपून बसण्याची शक्यता असल्याने विनाकारण अशा ठिकाणी जाणे टाळावे. लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये. पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी.
चंदगड तालुक्यात बिबट्याच्या वावराच्या घटनांची चर्चा
गेल्या महिनाभरात चंदगड तालुक्यात बिबट्याच्या वावरासंदर्भातील घटनांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे. ९ ऑक्टोबर रोजी मलतवाडी परिसरात कुत्र्यावर वन्यप्राण्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर वनविभागाने ड्रोनच्या माध्यमातून परिसराची पाहणी करण्याचे नियोजन केले होते.
तर २४ ऑक्टोबर रोजी गंधर्वगड परिसरातील माणगाव, सोनारवाडीसह आठहून अधिक गावांच्या शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे वृत्त समोर आले होते. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यासह ड्रोनद्वारे शोधमोहीमही राबविण्यात आली. मात्र, बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अद्याप यश आले नसल्याचे समजते.
सुगीच्या हंगामात शेतकऱ्यांची चिंता वाढली!
एकीकडे शेतीच्या कामांची धांदल आणि दुसरीकडे बिबट्यासदृश्य प्राण्याच्या दर्शनाची चर्चा, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. ऊसशेतीत पाणी पाजणे, जनावरांची देखभाल आणि इतर शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना पहाटेपासून रात्रीपर्यंत शेतात जावे लागते. त्यामुळे या संभाव्य वावराचा शेतीच्या कामांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने बसवाना मंदिर परिसरासह दूंडगे-कोवाड मार्गावर तातडीने पाहणी करून बिबट्याच्या वावराची खातरजमा करावी. आवश्यक असल्यास पिंजरा लावून गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, पाठलाग करणे किंवा फोटो काढण्यासाठी गर्दी करणे टाळावे. तातडीने वनविभागाला माहिती द्यावी. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सावधगिरी बाळगावी.












