मळवीवाडी जमीन प्रकरणासाठी ३ डिसेंबरपासून बेमुदत आंदोलन!
मळवीवाडी जमीन प्रकरणासाठी ३ डिसेंबरपासून बेमुदत आंदोलन!

गडहिंग्लज | प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील मळवीवाडी (तुडीये) येथील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करावी, या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने ३ डिसेंबर २०२६ पासून गडहिंग्लज उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत अर्धनग्न ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
महासंघाचे चंदगड तालुकाध्यक्ष प्रल्हाद रमेश कांबळे यांनी याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मळवीवाडी येथील सरकारी जमिनीचा वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये कथित बनावट आदेशाद्वारे बदल करून गैरव्यवहार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रकरणात केवळ कर्मचाऱ्यांपुरती चौकशी मर्यादित न ठेवता राजकीय नेते, महसूल अधिकारी, दलाल आणि अन्य संबंधितांची भूमिकाही तपासावी, अशी मागणी महासंघाने केली आहे. यापूर्वी आंदोलन करूनही प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली नसल्याचा आरोप करत आता मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.












