दुंडगेच्या सुपुत्राचा शैक्षणिक क्षेत्रात डंका!
राजेंद्र धोंडिबा पाटील यांना दोन प्रतिष्ठेचे शिक्षक पुरस्कार; ग्रामस्थांकडून सपत्नीक भव्य सत्कार

कोवाड : मूळचे चंदगड तालुक्यातील दुंडगे गावचे रहिवासी असलेले राजेंद्र धोंडिबा पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत दोन प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावले आहेत. सातारा जिल्ह्याच्या शिक्षण विभागामार्फत कराड तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६, तसेच महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), पुणे अंतर्गत राज्यस्तरीय 'आयडॉल शिक्षक' पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या दुहेरी यशामुळे दुंडगे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल दुंडगे ग्रामस्थांच्या वतीने राजेंद्र धोंडिबा पाटील यांचा सपत्नीक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक कार्याचे आणि यशाचे कौतुक केले.
राजेंद्र पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दुंडगे येथे झाले. त्यानंतर कोवाड येथील श्री राम ज्युनिअर कॉलेजमध्ये त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे डी.एड. पदवी संपादन करून त्यांनी शिक्षक म्हणून शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची या पुरस्कारांच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे.
ग्रामीण भागातून शिक्षणाचा प्रवास सुरू करून राज्यस्तरावर आपल्या कार्याची छाप उमटविणाऱ्या राजेंद्र पाटील यांनी दुंडगे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या यशामुळे गावातील विद्यार्थी, तरुण आणि नव्या पिढीला शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
दुंडगेच्या मातीत घडलेला शिक्षक आज राज्यस्तरावर सन्मानित झाला, ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.










