रेल्वेच्या नेमबाजी स्पर्धेत राधिका बरालेची ‘अचूक निशाणेबाजी’; सांघिक कांस्यपदकावर कोरले नाव!
सेंट्रल रेल्वेच्या जनरल चॅम्पियनशिपमध्ये मोलाचे योगदान; बेळगावच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक उंचावला
राधिका बराले आणि रोहित हवालदार यांचा सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, सुनीता सावंत आणि वंदना बाळेकुंद्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

बेळगाव | प्रतिनिधी
नेमबाजीच्या मैदानात अचूक लक्ष्य, जिद्द आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर कोल्हापूरच्या राधिका बराले (हवालदार) हिने राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवली आहे. कोलकाता येथील आसनसोलमध्ये पार पडलेल्या ५९ व्या अखिल भारतीय आंतररेल्वे नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत (59th All India Inter Railway Shooting Championship) राधिकाने १० मीटर एअर रायफल प्रकारात सांघिक कांस्यपदक पटकावून सेंट्रल रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत सेंट्रल रेल्वेचे प्रतिनिधित्व करताना राधिकाने उत्कृष्ट नेमबाजीचे प्रदर्शन केले. तिच्या या कामगिरीमुळे सेंट्रल रेल्वेच्या पदकतालिकेत महत्त्वाची भर पडली. विशेष म्हणजे, सेंट्रल रेल्वेला जनरल चॅम्पियनशिपचा बहुमान मिळवून देण्यातही तिचे योगदान मोलाचे ठरले. वैयक्तिक कौशल्यासोबतच सांघिक कामगिरीतही तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली.
रेल्वे सेवेत कर्तव्य बजावत राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रातही यश संपादन करणाऱ्या राधिकाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या या यशामुळे कोल्हापूरसह बेळगाव परिसराच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, राधिका बराले आणि रोहित हवालदार यांचा सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, सुनीता सावंत आणि वंदना बाळेकुंद्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी दोघांच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कर्तव्य रेल्वेचे, लक्ष्य पदकाचे आणि जिद्द विजयाची! राधिका बरालेच्या या यशाने महिला खेळाडूंसमोर नवा आदर्श निर्माण केला असून, तिच्या पुढील क्रीडा यशाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.










