बेळगावात ‘इव्हेंट मॅनेजर्स असोसिएशन’ची स्थापना!

बेळगाव : शहरातील इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्राला संघटित स्वरूप देण्याच्या उद्देशाने ‘बेळगाव इव्हेंट मॅनेजर्स असोसिएशन’ची स्थापना करण्यात आली. शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी काकती येथील फेअरफिल्ड बाय मॅरियट येथे या असोसिएशनचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, व्यावसायिक आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील सुमारे १५० प्रतिनिधी उपस्थित होते.
बेळगावमधील दहा इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी एकत्र येत या संघटनेची स्थापना केली आहे. या माध्यमातून इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील व्यावसायिकांमध्ये एकजूट निर्माण करणे, परस्पर सहकार्य वाढविणे, व्यवसायातील नैतिक मूल्यांचे पालन करणे आणि या क्षेत्राचा दर्जा उंचावणे हा प्रमुख उद्देश आहे.
उद्घाटन सोहळ्याला सेंट्राकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालिका व मधुमेहतज्ज्ञ डॉ. नीता देशपांडे, गोटे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक प्रभाकर एस. आपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवीन कार्यकारिणी अशी :
- अध्यक्ष : ब्रायन डिसोझा
- उपाध्यक्ष : विनायक मंगलवेढे
- सचिव व खजिनदार : शुभम जैन
संस्थापक सदस्यांमध्ये ब्रायन डिसोझा व अपूर्वा दड्डामणी (मेड क्रिएटिव्ह वर्क्स), विनायक मंगलवेढे व दीपा मंगलवेढे (इनोव्हेशन इव्हेंट्स), अजिंक्य कलकुंद्रिकर (यश इव्हेंट्स), सुदेश कुंद्री (सिक्स सिग्मा इव्हेंट्स), रोमॅरियो मेंडिस (मोस्टॅश इव्हेंट्स), प्रसाद मेलगे व निकिता मेलगे (प्लॅनिंग गुरूज इव्हेंट कंपनी), राजन गुलबानी (राजन इव्हेंट्स), शुभम जैन (शुभ इव्हेंट्स), केतन शिंदे व नितीन मुधाडा (इन्स्केप इव्हेंट्स) आणि यश संचेटी (द इव्हेंट वालो) यांचा समावेश आहे.

इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्राबरोबरच हॉटेल व्यवसाय, मनोरंजन, सजावट, निर्मिती, केटरिंग, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि फ्लॉवर डेकोरेशन यांसारख्या पूरक व्यवसायांशीही अधिक चांगले संबंध निर्माण करण्याचा असोसिएशनचा मानस आहे. यामुळे बेळगाव शहराला विविध कार्यक्रम आणि समारंभांसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्यास मदत होणार आहे.
संघटनेच्या माध्यमातून व्यावसायिकांना नेटवर्किंग, ज्ञानाची देवाणघेवाण, उद्योगातील अडचणींवर सामूहिक तोडगा आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अधिक संघटित, सहकार्यपूर्ण आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्राचा विकास करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.











