कबड्डी खेळण्यासाठी गेला अन् बंधाऱ्यात बुडाला!
कोनेवाडी बंधाऱ्यात १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; चंदगड तालुक्यात हळहळ

चंदगड | प्रतिनिधी
कोनेवाडी (ता. चंदगड) येथील बंधाऱ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) घडली. पृथ्वीराज तुकाराम गावडे (रा. नागणवाडी, ता. चंदगड) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे नागणवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चंदगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीराजचे आजोबा लक्ष्मण तुकाराम गावडे हे शनिवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पृथ्वीराजला सोबत घेऊन नागणवाडी येथील आपल्या शेताकडे गेले होते. यावेळी पृथ्वीराज मित्रांसोबत कबड्डी खेळण्यासाठी जात असल्याचे सांगून तेथून निघून गेला.
दरम्यान, दुपारी सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास नंदकुमार मारुती गावडे यांनी शेतात जाऊन आजोबांना तुमचा नातू पृथ्वीराज कोनेवाडी बंधाऱ्यातील पाण्यात पडून बुडाला असल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच आजोबा व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे पाण्यात बुडालेल्या पृथ्वीराजला बाहेर काढून खासगी वाहनातून चंदगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद चंदगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल चौगुले यांच्याकडे देण्यात आला आहे.
कबड्डी खेळण्याच्या उत्साहात घराबाहेर पडलेल्या चिमुकल्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.












