चंदगडमध्ये चोर मचाये शोर!
नागरदळे (ता. चंदगड )येथे भरदिवसा घरफोडी; सव्वा लाख नव्हे, तब्बल १ लाख ९० हजारांचा ऐवज लंपास

चंदगड | प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, नागरदळे येथे भरदिवसा घरफोडी करून तब्बल १ लाख ९० हजार ५०० रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप कटरने तोडून घरात प्रवेश केला आणि दागिन्यांवर डल्ला मारला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, नागरदळे (ता. चंदगड) येथील पूजा रामदास पाटील (वय ३०) यांच्या राहत्या घरी बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.१५ या अवघ्या ४५ मिनिटांच्या कालावधीत ही चोरी झाली.
अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर ७ तोळे वजनाचे चांदीचे पैंजण (किंमत १० हजार ५०० रुपये), ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स (६० हजार रुपये), ५ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील रिंग (६० हजार रुपये) आणि ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (६० हजार रुपये), असा एकूण १ लाख ९० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
विशेष म्हणजे, घरफोडीसाठी चोरट्याने कटरचा वापर केल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. चोरीला गेलेला मुद्देमाल अद्याप मिळून आलेला नाही. याप्रकरणी १२ नोव्हेंबर रोजी चंदगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (३) आणि ३(५) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
भरदिवसा घरफोडी होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवून या चोरीचा छडा लावावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.












