सातबारा दुरुस्तीसाठी १५ हजारांची लाच मागितली; खासगी इसम ACBच्या जाळ्यात!
१२ हजार रुपये स्वीकारताना सूरज सोळांकुरे रंगेहाथ पकडला; महसूल कार्यालयातील अवधूत लोंढे याचाही लाच मागणीत सहभाग उघड

चंदगड प्रतिनिधी: सातबारा उताऱ्यावरील क्षेत्राची दुरुस्ती करून जमिनीवर नाव नोंदविण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे उघडकीस आला आहे. तडजोडीनंतर १२ हजार रुपये स्वीकारताना खासगी इसम सूरज कुंतीनाथ सोळांकुरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणात महसूल कार्यालयातील खासगी उमेदवार अवधूत रामचंद्र लोंढे याचाही सहभाग समोर आल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
प्रकरण काय ?
तक्रारदाराची नागाव येथे वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीच्या गटामध्ये चुकीचे क्षेत्र नोंदविले गेल्याने सातबारा उताऱ्यावर योग्य क्षेत्राची नोंद करण्यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालय, हातकणंगले येथे अर्ज केला होता. पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण नागाव येथील तलाठी कार्यालयाकडे आले होते. सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नाव नोंदविण्यासाठीही तक्रारदाराने आवश्यक कागदपत्रे सादर केली होती.
दरम्यान, या कामाबाबत विचारणा केली असता तलाठ्यांनी कार्यालयातील खासगी उमेदवार अवधूत रामचंद्र लोंढे यांची भेट घेण्यास सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर लोंढे यांनी तलाठी मॅडम तुमचे क्षेत्र दुरुस्त करून सातबाऱ्यावर नाव नोंदवून देणार आहेत, त्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
ACB च्या पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न
या प्रकारामुळे तक्रारदाराने कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. ACBने केलेल्या पडताळणीत अवधूत लोंढे यांनी काम करून देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच खासगी इसम सूरज कुंतीनाथ सोळांकुरे याच्यामार्फत १२ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरल्याचेही समोर आले.
पंचांसमक्ष सापळा; १२ हजार स्वीकारताना पकड
त्यानंतर ACBच्या पथकाने पंचांसमक्ष सापळा रचला. यावेळी सूरज कुंतीनाथ सोळांकुरे (वय ४२, रा. शिवाजी चौक, नागाव) याने तक्रारदाराकडून १२ हजार रुपये स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईत अवधूत रामचंद्र लोंढे (वय ३७, खासगी उमेदवार, ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, नागाव) याचाही लाच मागणीतील सहभाग निष्पन्न झाल्याचे वृत्तात नमूद आहे.
या दोघांविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व ३१ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
सातबारा दुरुस्तीसाठी नागरिकांना लाच द्यावी लागणार असेल, तर महसूल यंत्रणेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, शासकीय कामकाजात खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप कितपत वाढला आहे, याचीही या घटनेने चर्चा सुरू झाली आ











