कामेवाडीत हनुमान मंदिर परिसरात तरुणांवर लोखंडी रॉड व धारदार शस्त्राने हल्ला
पाच जणांविरुद्ध चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल;

चंदगड : तालुक्यातील कामेवाडी येथे हनुमान मंदिराच्या ग्राउंडवर पालखी सोहळ्याच्या निमित्ताने जमलेल्या तरुणांमध्ये झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी समर्थ पाटील, पवन मुतनाळे, कुमार (पूर्ण नाव समजू शकले नाही), अविनाश पाटील आणि आकाश पाटील या पाच जणांविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कामेवाडी येथील हनुमान मंदिराच्या ग्राउंडवर ही घटना घडली. फिर्यादी पुंडलिक प्रकाश पाटील (वय २४, व्यवसाय फोटोग्राफी) हे मित्र अजित शिरगे व शुभम पाटील यांच्यासह पालखी सोहळ्यासाठी तेथे जमले होते.
यावेळी संशयितांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना उद्देशून धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुन्हा झालेल्या वादातून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच लोखंडी रॉड व हातातील कड्याने मारहाण केल्याने फिर्यादीसह तिघांना दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
जखमींना गडहिंग्लज येथील समर्थ अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर मिळालेल्या वैद्यकीय वर्दीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख पुढील तपास करीत आहेत.











