चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निधी खर्चाची चौकशी करा!
दिव्यांग, महिला-बालकल्याण व मागासवर्गीयांच्या निधीच्या विनियोगावर प्रश्नचिन्ह; ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी
चंदगड : मधील ग्रामपंचायतींच्या एकूण उत्पन्नातून दिव्यांगांसाठी ५ टक्के, महिला व बालकल्याणासाठी १० टक्के, तर मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी १५ टक्के निधी खर्च करण्याच्या तरतुदीचा योग्य विनियोग होत नसल्याचा आरोप भारतीय दलित महासंघाचे चंदगड तालुकाध्यक्ष प्रल्हाद कांबळे यांनी केला आहे. या निधीच्या खर्चाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कांबळे यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात, ३१ मार्च २०२३ ते २०२६ अखेरच्या कालावधीतील ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातून संबंधित घटकांसाठी राखीव असलेल्या निधीच्या खर्चाची तपासणी करण्याची मागणी केली आहे. शासनाच्या नियमानुसार विशिष्ट घटकांसाठी राखीव निधी त्याच घटकांच्या उन्नतीसाठी खर्च करणे बंधनकारक असताना, ग्रामपंचायत स्तरावर या तरतुदींचे पालन होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कागदोपत्री खर्च की लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ?
संबंधित निधी खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो का, याबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या दप्तरांची आणि बँक खात्यांची तपासणी करून निधीचा विनियोग नियमानुसार झाला आहे की नाही, याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधित ग्रामसेवकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत लेखी अहवाल द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा २ नोव्हेंबर २०२६ रोजी चंदगड पंचायत समितीसमोर निदर्शने व ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय दलित महासंघाने दिला आहे.
आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
दिव्यांग, महिला-बालकल्याण आणि मागासवर्गीय घटकांसाठी राखीव निधीचा योग्य विनियोग झाला आहे की नाही, हा या निवेदनातून उपस्थित झालेला महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निधी खर्चाची तपासणी करणार का आणि चौकशीतून काय निष्पन्न होणार, याकडे लक्ष लागले आहे.
निवेदनावर श्रीकांत कांबळे, अमोल कांबळे, बबलू चौगुले, चंद्रकांत काळे, अनिल पुजारी, विक्रम सामुदे ,पन्नालाल इंगळे, दशरथ बागडी, आकाश कांबळे आदींच्या सह्या आहेत.
















