चंदगडमध्ये विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू व नणंदेविरुद्ध गुन्हा
पाच लाख रुपयांची मागणी, मारहाण व धमकावल्याचा विवाहितेचा आरोप; चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल

चंदगड : विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करणे, मारहाण करणे, पैशांची मागणी करून धमकावणे तसेच घरातून हाकलून दिल्याच्या आरोपावरून चंदगड पोलिस ठाण्यात पतीसह सासू व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा सुरेश कांबळे (वय ३५, व्यवसाय घरकाम, रा. मजरे शिरगाव, ता. चंदगड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात पती सुरेश गोपाळ कांबळे, सासू रुक्मिणी गोपाळ कांबळे आणि गीता ज्ञानेश्वर कांबळे अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार, १५ मे २०११ ते १४ जुलै २०२६ या कालावधीत मजरे शिरगाव तसेच बेळगाव व पुणे येथे फिर्यादीचा कथित मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपी पती याने मारहाण केल्याचे, तसेच बाहेरील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त करून फिर्यादीला त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
तसेच, सर्व आरोपी यांनी संगनमताने फिर्यादीला अपमानास्पद वागणूक देत मारहाण केली आणि माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करून धमकावल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. मागणी पूर्ण न केल्यास जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादीच्या अंगावरील दागिने काढून घेऊन तिला घरातून हाकलून दिल्याचा, तसेच तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या स्त्रीधनातील वस्तू विकून टाकल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे आपला मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
या प्रकरणी चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.२७ वाजता गुन्ह्याची नोंद झाली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चौगुले करत आहेत.















