प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर कोयता व विळ्याने हल्ला; चंदगडमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा

चंदगड : प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणाला जिवे मारण्याची धमकी देत कोयता व विळ्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा परिसरात घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर दत्तू नाईक आणि अशोक रामू नाईक (दोघेही रा. वरगाव, ता. चंदगड) यांच्याविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, फिर्यादी अजय दत्तू नाईक (वय २८, व्यवसाय शेती, रा. वरगाव, ता. चंदगड) हे १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास पाटणे फाटा येथील शारदा मोबाईल शॉपीसमोरील मोकळ्या जागेत असलेल्या आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेले होते.
त्यावेळी संशयित आरोपींनी फिर्यादीने पत्नी निशा हिच्याशी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर एका संशयिताने कोयत्याने डोक्यावर व उजव्या हाताच्या मनगटाजवळ वार केल्याचे, तर दुसऱ्या संशयिताने विळ्याने डोक्यावर व मानेवर वार केल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला, मानेजवळ तसेच हाताच्या मनगटाजवळ आणि पोटावर गंभीर दुखापती झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), ३(५) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल उनाळे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.















