चंदगडमध्ये २२ गुन्ह्यांतील ४५० बॉक्स गोवा बनावटीची दारू नष्ट

चंदगड : पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूबंदी अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या एकूण २२ गुन्ह्यांमधील गोवा बनावटीची विविध ब्रँडची तब्बल ४५० बॉक्स दारू नष्ट करण्यात आली. धनगरवाडा, बॉक्साइट रोड, चंदगड येथे आज ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी, चंदगड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच दोन पंचांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
जेसीबीच्या साहाय्याने दारू नष्ट
जप्त करण्यात आलेल्या दारूमध्ये रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, डीएसपी ब्लॅक, गोल्डन एस, फाईन ब्ल्यू, रिझर्व्ह सेवन यांसह विविध ब्रँडचा समावेश होता. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित दारूचे बॉक्स जेसीबीच्या साहाय्याने फोडून त्यातील दारू नष्ट करण्यात आली.
गोवा बनावटीच्या दारूच्या वाहतुकीवर लक्ष
चंदगड तालुक्याला गोवा राज्याची सीमा लागून असल्याने गोव्यातून स्वस्त दरातील दारूची चोरट्या मार्गाने वाहतूक होण्याचे प्रकार घडतात. चंदगड तालुक्यासह येथून इतर ठिकाणी अवैधरीत्या दारू पोहोचवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांकडून कारवाई केली जाते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडहिंग्लज विभागाकडून तसेच चंदगड पोलिसांकडून नियमित गस्त घालणे, संशयित ठिकाणी धाडी टाकणे आणि अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात कारवाई करणे सुरू असते. या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या दारूची न्यायालयाच्या आदेशानुसार विल्हेवाट लावण्यात येते.
चंदगड परिसरातील अवैध दारूची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर २२ गुन्ह्यांतील ४५० बॉक्स दारू नष्ट करण्याची ही महत्त्वपूर्ण कारवाई ठरली.












