कानूर आरोग्य केंद्राच्या सुशोभीकरणासाठी २० लाखांचा निधी!
जि. प. सदस्या राजश्री गावडे यांची ग्वाही; ग्रामीण आरोग्यसेवेला बळकटी देण्याचा निर्धार

चंदगड प्रतिनिधी : कानूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुशोभीकरण व विकासासाठी जिल्हा परिषद फंडातून २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही अडकूर मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. राजश्री लक्ष्मण गावडे यांनी दिली.
२३ नोव्हेंबर रोजी आयोजित आढावा बैठकीत त्यांनी आरोग्य केंद्राची पाहणी करून इमारत, स्वच्छता, औषधसाठा आणि रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी केंद्राचा सर्वांगीण विकास करण्यावर त्यांनी भर दिला.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाबूलाल सोमजाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्लम नाईकवाडी, लक्ष्मण गावडे, पंचायत समिती सदस्या मनस्विनी कांबळे, सरपंच गुंडुपंत कबाडी, उपसरपंच विशाल गावडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.












