गडहिंग्लज, चंदगड, आजऱ्याच्या रस्त्यांसाठी २२.२५ कोटींचा निधी मंजूर!
अमृतकाल रस्ते विकास आराखड्याला बळ; गडहिंग्लजला सर्वाधिक १२.५० कोटी, चंदगडला ५ तर आजऱ्याला ४.७५ कोटी

चंदगड : विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा या तीन तालुक्यांतील रस्ते विकासाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमृतकाल रस्ते विकास आराखड्यांतर्गत मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण २२ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार शिवाजीराव श. पाटील यांनी ही माहिती दिली.
मंजूर निधीमध्ये गडहिंग्लज तालुक्यासाठी १२ कोटी ५० लाख रुपये, चंदगड तालुक्यासाठी ५ कोटी रुपये, तर आजरा तालुक्यासाठी ४ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे तीनही तालुक्यांतील रस्त्यांच्या विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
ग्रामीण भागातील रस्ते हे शेती, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. अनेक गावांतील नागरिकांना खराब रस्त्यांमुळे प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मंजूर निधीतून रस्त्यांची कामे मार्गी लागल्यास ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
या निधी मंजुरीबद्दल आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मतदारसंघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.
दरम्यान, निधी मंजूर झाल्यानंतर आता कोणत्या रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घेतली जातात आणि प्रत्यक्ष कामांना कधी सुरुवात होते, याकडे तीनही तालुक्यांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.












