फॉर्म-७ प्रकरणी डॉ. रवी पाटील यांची पोलिस चौकशी
मतदार यादीतील नावांवर आक्षेप घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या फॉर्म-7 अर्जांच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून, भाजप नेते डॉ. रवी पाटील आज मार्केट पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. पोलिसांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देत चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याचे डॉ. पाटील यांनी माहिती दिली.

बेळगाव प्रतिनिधी : मतदार यादीतील नावांवर आक्षेप घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या फॉर्म-7 अर्जांच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून, भाजप नेते डॉ. रवी पाटील आज मार्केट पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. पोलिसांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देत चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
मतदार यादीतील काही नावांवर आक्षेप नोंदविण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फॉर्म-7 अर्ज संबंधित बीएलओंकडे (BLO) जमा करण्यात आले होते. या अर्जांमागील प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील बाबींची पोलिसांकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जामीन मिळाल्याचे डॉ. रवी पाटील यांनी सांगितले.
‘नाव कमी करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही’
या प्रकरणाबाबत भूमिका स्पष्ट करताना डॉ. रवी पाटील यांनी मतदार यादीतून कोणत्याही व्यक्तीचे नाव कमी करण्याचा अधिकार आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट केले. मतदार यादीतील नावाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाच्या संबंधित अधिकाऱ्यांचा असल्याचे त्यांनी सांगितले.
फॉर्म-7च्या माध्यमातून मतदाराच्या नावावर आक्षेप नोंदविणे आणि त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची पडताळणी करून प्रत्यक्ष नाव कमी करणे या दोन स्वतंत्र प्रक्रिया असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे फॉर्म-7 अर्ज दाखल करणे म्हणजे संबंधित मतदाराचे नाव थेट मतदार यादीतून कमी करणे नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा आरोप फेटाळला
फॉर्म-7 अर्जांच्या माध्यमातून कोणत्याही विशिष्ट समाजातील मतदारांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप डॉ. रवी पाटील यांनी फेटाळून लावला. मतदार यादीतील नावांवर आक्षेप नोंदविण्याच्या प्रक्रियेतूनच हे अर्ज दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आपण कोणतीही चूक मान्य केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपली चूक मान्य केल्याचा दावा चुकीचा असून, या प्रकरणातील आपली भूमिका आपण यापूर्वीही स्पष्ट केली असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
‘पक्षाच्या सूचनेनुसार अर्ज जमा केले’
दरम्यान, पक्षाच्या सूचनेनुसार कार्यकर्त्यांनी प्रत्येकी सुमारे ३० आक्षेप अर्ज जमा करून परत आल्याचेही डॉ. रवी पाटील यांनी सांगितले. हे अर्ज केवळ मतदार यादीतील नावांवर आक्षेप नोंदविण्याच्या उद्देशाने बीएलओंकडे सादर करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत अर्ज स्वीकारणे, त्यांची छाननी करणे तसेच मतदाराचे नाव मतदार यादीतून कमी करण्याबाबतचा निर्णय घेणे ही संबंधित निवडणूक यंत्रणेची प्रक्रिया असल्याचे त्यांनी नमूद केले.
लवकरच पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करणार
या प्रकरणात अनिल बेनके आणि गीता सुतार आदींनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता लवकरच पत्रकार परिषद घेऊन फॉर्म-7 अर्ज प्रकरणाशी संबंधित संपूर्ण माहिती, अर्ज दाखल करण्यामागील प्रक्रिया आणि आपली भूमिका याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे डॉ. रवी पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणातील पोलिस तपास आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया काय वळण घेते, याकडे राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून चौकशीदरम्यान नेमकी कोणती माहिती किंवा कागदपत्रे तपासण्यात आली, तसेच पुढील तपासाची दिशा काय असेल, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.















