अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; मजरे शिरगावच्या २४ वर्षीय तरुणावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा!
चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल; ओंकार (बबलू) अशोक मुळीक याचे नाव आरोपी म्हणून नोंद

चंदगड प्रतिनिधी : मजरे शिरगाव (ता. चंदगड) येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून २४ वर्षीय तरुणाविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार ऊर्फ बबलू अशोक मुळीक (वय २४, रा. मजरे शिरगाव, ता. चंदगड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या तक्रारीनुसार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.१५ ते १२.३० या वेळेत आरोपीच्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर ही कथित घटना घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मोबाईलवरून तक्रारदार महिलेशी संपर्क साधून तिच्या अल्पवयीन मुलीला शैक्षणिक प्रकल्पासाठी मदत करण्याच्या बहाण्याने मराठी विषयाचे पुस्तक पाठविण्यास सांगितले. त्यानंतर मुलीला पुस्तक देण्यासाठी घरी पाठविण्यात आले असता, आरोपीने तिच्या अज्ञानाचा व बालवयाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी तक्रारदार महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून १६ नोव्हेंबर २०२६ रोजी चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४(१), ६५(१) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) २०१२ मधील कलम ३, ४, ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची नोंद आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले करीत आहेत.
अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
शैक्षणिक मदत आणि विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलींना लक्ष्य केले जात असल्याच्या तक्रारी गंभीर चिंतेचा विषय ठरत आहेत. या प्रकरणातील आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.












