चंदगडमध्ये बीएसएनएल टॉवरवर चोरट्यांचा डल्ला!
चंदगड मध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच. चंदगड पोलिसांना चोरांचे आव्हान. महिपाळगड येथून ६ लाख १९ हजारांचे साहित्य लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

चंदगड प्रतिनिधी :चंदगड तालुक्यातील महिपाळगड येथील बीएसएनएल टॉवरला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी टॉवरच्या आऊटडोअर हटमधील महागडे तांत्रिक साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत तब्बल ६ लाख १९ हजार ५० रुपयांचे साहित्य लंपास झाले असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत महिपाळगड येथील बीएसएनएल टॉवरच्या खाली असलेल्या आऊटडोअर हटमधून अज्ञात व्यक्तीने हे साहित्य चोरून नेले.
चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये ३ लाख ८७ हजार ७०८ रुपये किमतीचे सहा टीजीटी कार्ड, १ लाख ४७ हजार ३४२ रुपये किमतीचे तीन कॉम्बायनर कार्ड (Combiner-AGC9P) आणि ८४ हजार रुपये किमतीचे तीन टीआरडीयू कार्ड (TRDU) यांचा समावेश आहे. या सर्व साहित्याची एकूण किंमत ६ लाख १९ हजार ५० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सौरभ सुभाष शाह (वय ४०, व्यवसाय नोकरी, सध्या रा. रामदेव गल्ली, चंदगड) यांनी चंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ३८४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२८ नोव्हेंबर रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार भारती करीत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
बीएसएनएलसारख्या महत्त्वाच्या दूरसंचार यंत्रणेतील साहित्य चोरीला गेल्याने या घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे. या चोरीमागे कोणाचा हात आहे आणि चोरीचे साहित्य कुठे गेले, याचा तपास आता पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे.












