कोवाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत!
वृद्ध महिला आणि चिमुकल्याला चावा; दोघेही गंभीर जखमी

कोवाड | प्रतिनिधी
कोवाडमध्ये आज सकाळपासून पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कुत्र्याने खोराटे गल्ली येथील एका वृद्ध महिलेसह राम मंदिर परिसरात लहान मुलाला चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून कोवाडमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
जखमी वृद्ध महिला आणि मुलाला तातडीने वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक आहे. तसेच संबंधित प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. अनोळखी किंवा आक्रमक कुत्र्यांपासून दूर राहावे. कुत्रा दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये.
कोवाडकरांनो, सावधान! संभाव्य धोका लक्षात घेता सतर्क राहा. प्रशासनानेही तातडीने उपाययोजना कराव्यात.












