ना बदनामीची भीती, ना नोकरीची चिंता!
मजरे शिरगावच्या माऊलीनंतर कारखान्यातील तरुणींचाही अन्यायाविरुद्ध एल्गार; दोन तक्रारींनी व्यवस्थापनाची कसोटी!

चंदगड | प्रतिनिधी
अन्याय सहन करण्यात सामाजिक प्रतिष्ठा नसते, तर अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्यात खरा स्वाभिमान असतो, हा संदेश चंदगड तालुक्यातील दोन घटनांनी समाजासमोर ठेवला आहे. मजरे शिरगाव येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नात्यातील व्यक्तीकडून अत्याचार झाल्याच्या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने पुढे येत पोलिसांत तक्रार दाखल केली. सामाजिक प्रतिष्ठा, लोकलज्जा किंवा नातेसंबंधांचा विचार न करता मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तिने दाखवलेले धाडस समाजासाठी दिशादर्शक ठरले. आता याच अन्यायाविरुद्ध लढण्याच्या भूमिकेचा प्रत्यय एका नामांकित औद्योगिक आस्थापनातील उच्चशिक्षित तरुणीने दिला आहे.
कारखान्यातील वरिष्ठ परप्रांतीय अधिकाऱ्याविरोधात महिला कर्मचाऱ्यांकडून कथित गैरवर्तनाच्या तक्रारी दाखल झाल्याने औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, एकाच वेळी कंपनी व्यवस्थापनाकडे दोन तक्रारी दाखल झाल्याने व्यवस्थापनासमोर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे. संबंधित अधिकाऱ्याकडून महिला सहकाऱ्यांशी कथित 'अनवॉन्टेड टच' (Unwanted Touch) झाल्याचे आरोप तक्रारींतून करण्यात आल्याची माहिती आहे.
मजरे शिरगावच्या माऊलीने दाखवला मार्ग!
१२ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्यानंतर अनेकदा समाजात अशा प्रकरणांमध्ये कुटुंबाची प्रतिष्ठा, बदनामी आणि नातेसंबंध यांचा विचार करून तक्रार करण्यास टाळाटाळ केली जाते. मात्र, मजरे शिरगाव येथील पीडित मुलीच्या आईने या मानसिकतेला छेद दिला. आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाविरोधात तिने तक्रार दाखल करून आरोपीविरुद्ध कायदेशीर लढा उभारण्याचा निर्णय घेतला.
'समाज काय म्हणेल?' यापेक्षा 'माझ्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे!' ही भूमिका तिने घेतली. सामाजिक प्रतिष्ठा ही अन्याय लपवण्यात नसून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात आहे, हे या माऊलीने कृतीतून दाखवून दिले.
उच्चशिक्षित तरुणीचाही स्वाभिमानासाठी लढा!
आता कारखान्यातील उच्चशिक्षित तरुणीनेही नोकरी, भविष्य किंवा सामाजिक दबावाचा विचार न करता कथित गैरवर्तनाविरोधात तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे. एकाच वेळी दोन तक्रारी पुढे आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या तरुणींच्या धाडसामुळे कारखान्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
चंदगड तालुक्यासह इतर राज्यांतील मोठ्या संख्येने कर्मचारी या कंपनीत कार्यरत आहेत. मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या या औद्योगिक आस्थापनात महिला कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक आणि सुरक्षित वातावरण मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता महिला सुरक्षेबाबतचे 'झिरो टॉलरन्स' धोरण प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे.
चौकशी समितीची कसोटी; प्रभावशाली अधिकाऱ्याला अभय मिळणार का?
या प्रकरणात अंतर्गत चौकशी समिती नेमण्यात आल्याची माहिती असली, तरी चौकशीचा कालावधी, निष्कर्ष आणि पुढील कारवाईबाबत अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. कंपनीच्या आर्थिक धोरणांशी तसेच नफ्या-तोट्याच्या निर्णयांशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात तक्रारी असल्याने चौकशी निष्पक्ष आणि दबावमुक्त होणार का,हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
अधिकाऱ्याचे पद, अधिकार आणि कंपनीतील प्रभाव यापेक्षा महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता मोठी मानली जाणार का? तक्रारदार महिलांना कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ न देता न्याय दिला जाणार का? चौकशी समिती नेमक्या किती कालावधीत निर्णय घेणार? या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थापनाला द्यावी लागणार आहेत.
आता महिला कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची!
मजरे शिरगावच्या माऊलीने आपल्या मुलीसाठी अन्यायाविरुद्ध लढण्याचे धाडस दाखवले, तर कारखान्यातील उच्चशिक्षित तरुणींनी कामाच्या ठिकाणी सन्मान आणि सुरक्षिततेचा अधिकार अधोरेखित केला आहे. या दोन्ही घटनांचा संदेश एकच आहे—अन्याय सहन करणे ही प्रतिष्ठा नाही आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हीच खरी हिंमत आहे.
आता संबंधित कंपनी व्यवस्थापन या तरुणींना निष्पक्ष चौकशीद्वारे न्याय देणार का, की झिरो टॉलरन्सचा नारा केवळ जाहिरात आणि धोरणापुरताच राहणार, याकडे चंदगड तालुक्याचे लक्ष लागले आहे.
महिलांचा स्वाभिमान विरुद्ध सत्तेचा प्रभाव! या संघर्षात न्यायाची बाजू कोण घेणार, हेच आता पाहावे लागणार आहे.












