चंदगड तालुक्यावर आता ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर!
पेट्रोल पंप, हॉटेल, बीअर बार, मॉल, मंदिरांसह गावोगावी CCTV चे जाळे; कानूर खुर्द-बुद्रुकमध्ये १० कॅमेरे कार्यान्वित

चंदगड :गोवा आणि कर्नाटकच्या सीमेला लागून असलेल्या चंदगड तालुक्यात अवैध वाहतूक, गुन्हेगारी आणि संशयास्पद हालचालींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी CCTV सुरक्षेची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. पेट्रोल पंप, मॉल, बीअर बार, हॉटेल, मंदिरे तसेच गावांतील महत्त्वाच्या ठिकाणी आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे.
तालुक्यातील व्यावसायिक आस्थापनांमध्ये यापूर्वीच बसविण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांपैकी किमान दोन कॅमेरे मुख्य रस्त्यावरील वाहनांची ये-जा, वाहनांचे क्रमांक आणि संशयास्पद हालचाली टिपतील अशा पद्धतीने लावण्याचे आवाहन चंदगड पोलिसांनी केले आहे. यामुळे गुन्हे घडण्यास प्रतिबंध होण्याबरोबरच गुन्ह्यांचा तपास करण्यासाठीही महत्त्वाचे पुरावे उपलब्ध होणार आहेत.
पोलीस पाटलांमार्फत गावागावांत जनजागृती
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटलांची बैठक घेऊन गावांमध्ये CCTV यंत्रणा उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्तरीय समित्यांच्या सहकार्याने महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कानूरमध्ये १० कॅमेरे कार्यान्वित
पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कानूर खुर्द आणि कानूर बुद्रुक येथे बेळगाव- वेंगुर्ला मार्गावरील अवैध दारू वाहतूक व गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी एकूण १० CCTV कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व पोलीस पाटील यांनी पुढाकार घेतला. ग्रामपंचायतीच्या निधीतून आर्थिक तरतूद करण्यात आली, तर श्री गुरुकृपा काजू इंडस्ट्रीजचे गुरुनाथ बल्लाळ यांनी सहकार्य केले.
सीमाभागातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता तालुक्यातील अन्य गावांतही CCTV यंत्रणेचे जाळे उभारण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘गाव सुरक्षित, रस्ते सुरक्षित आणि नागरिक सुरक्षित’ हे उद्दिष्ट ठेवून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत ग्रामपंचायती, व्यावसायिक आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केले आहे.











