मांडेदुर्ग येथे वारणा बँकेच्या मालमत्तेवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप
तिघांविरोधात चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल

चंदगड : मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील शिवांक कॅश्यू प्रोसेसिंग युनिटच्या मशीनरी व शेड इमारतीत असलेल्या बँकेच्या ताब्यातील मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा घेऊन तिचा वापर केल्याच्या आरोपावरून तिघांविरोधात चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नारायण गोपाळ दळवी, नितीन नारायण दळवी आणि यशोदा गोपाळ दळवी (सर्व रा. मांडेदुर्ग, ता. चंदगड) यांच्यावर कारवाईची नोंद करण्यात आली आहे.
गडहिंग्लज येथील वारणा बँकमध्ये वसुली विभागात कार्यरत असलेले अधिकारी प्रशांत पांडुरंग कांडगावकर (वय ४२, मूळ रा. माले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.५० वाजण्याच्या सुमारास मांडेदुर्ग येथील संबंधित ठिकाणी बँकेच्या ताब्यातील मालमत्तेच्या संदर्भात हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. सुरक्षा रक्षक यमाजी मऱ्यापा कांबळे हे कर्तव्यावर असताना बँकेच्या ताब्यातील मालमत्तेत विनापरवानगी प्रवेश करून कुलूप तोडण्यात आले आणि मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा घेऊन तिचा वापर करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या तक्रारीवरून चंदगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस पुढील तपास करीत आहेत.











