कोवाडच्या विकासाला भ्रष्टाचाराचे ग्रहण? लोकवर्गणीतून उभारलेल्या बाकड्यांवर ग्रामपंचायतीचे ४९ हजार ५०० रुपयांचे बिल!
रणजितनगर फाउंडेशनचा गंभीर आक्षेप; २०२३ मध्ये लोकसहभागातून बसवलेल्या बाकड्यांची छायाचित्रे 'मेरी पंचायत' पोर्टलवर अपलोड केल्याचा आरोप; सरकारी निधीच्या विनियोगावर प्रश्नचिन्ह!

कोवाड | प्रतिनिधी
कोवाड ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध तक्रारी आणि आरोप समोर येत असतानाच आता सिमेंटच्या बाकड्यांच्या बिलावरून नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, ज्या बाकड्यांची उभारणी एका सामाजिक फाउंडेशनने लोकवर्गणीतून केल्याचा दावा केला आहे, त्याच बाकड्यांच्या छायाचित्रांचा वापर ग्रामपंचायतीने शासकीय पोर्टलवर केल्याचा गंभीर आक्षेप घेण्यात आला आहे. या कामासाठी तब्बल ४९ हजार ५०० रुपयांचे बिल मंजूर झाल्याचा मुद्दाही आता चर्चेत आला आहे.
रणजितनगर फाउंडेशन, कोवाड यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिलेल्या लेखी निवेदनातून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

२०२३ मध्ये लोकवर्गणीतून बाकड्यांची उभारणी!
फाउंडेशनच्या निवेदनानुसार, सन २०२३ मध्ये गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी तसेच तळीमाळ परिसर आणि पाण्याच्या टाकीजवळ विविध सार्वजनिक ठिकाणी सिमेंटची बाकडी बसविण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला होता. या बाकड्यांचा संपूर्ण खर्च लोकवर्गणी आणि फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला. देणगीदारांच्या सहभागातून बाकड्यांवर नावांसह बेंच उपलब्ध करून देण्यात आले होते. या कामाचे पुरावे आणि छायाचित्रे फाउंडेशनकडे असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
जुन्याच बाकड्यांची छायाचित्रे पोर्टलवर?
फाउंडेशनने केलेल्या आरोपानुसार, ग्रामपंचायतीने यापूर्वीच लोकसहभागातून बसवलेल्या बाकड्यांची छायाचित्रे काढून त्यावरील नावे हटवून 'मेरी पंचायत' (Meri Panchayat) पोर्टलवर २० मार्च २०२५ रोजी अपलोड केली आहेत.
विशेष म्हणजे, फाउंडेशनला कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा त्यासाठी कोणताही खर्च न करता हा प्रकार करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

४९ हजार ५०० रुपयांचे बिल नेमके कशासाठी?
या प्रकरणात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आर्थिक व्यवहाराच्या स्क्रीनशॉटमध्ये सिमेंट बाकडीसंदर्भात ४९ हजार ५०० रुपयांच्या देयकाची नोंद दिसून येते. त्यामुळे नेमकी कोणती नवीन बाकडी खरेदी केली? ती कुठे बसवली? त्यांची प्रत्यक्ष पाहणी झाली का? तसेच यापूर्वीच लोकवर्गणीतून बसवलेल्या बाकड्यांची छायाचित्रेच पुन्हा शासकीय कामासाठी वापरण्यात आली का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
जर यापूर्वीच लोकवर्गणीतून उभारलेल्या बाकड्यांच्या नावावर नव्याने शासकीय खर्च दाखवला असेल, तर हा प्रकार केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाचा नसून शासकीय निधीच्या संभाव्य गैरवापराचा गंभीर विषय ठरू शकतो.

ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिका काय?
या प्रकरणी रणजितनगर फाउंडेशनने ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, व्हिडिओच्या माध्यमातूनही स्थानिक नागरिकांनी या व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
ग्रामपंचायतीने संबंधित बाकड्यांची खरेदी कधी केली? पुरवठादार कोण? प्रत्यक्ष किती बाकडी बसवली? त्याची बिले, मोजमाप पुस्तिका, देयक मंजुरी आणि मेरी पंचायत पोर्टलवरील छायाचित्रांची नोंद काय सांगते? याची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे.
आता चौकशी केवळ कागदावर नको, प्रत्यक्ष जागेवर व्हावी!
कोवाड ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत यापूर्वीही स्थानिक तरुणांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे विविध तक्रारी दाखल केल्या आहेत. आता बाकड्यांच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकांनी वर्गणी काढून केलेल्या सामाजिक कामाचे श्रेय किंवा खर्च सरकारी तिजोरीतून दाखवला जात असेल, तर यापेक्षा गंभीर बाब कोणती?
या प्रकरणात केवळ कागदपत्रांची पडताळणी न करता प्रत्यक्ष स्थळपाहणी, देयकांची तपासणी, छायाचित्रांची तारीख आणि पोर्टलवरील अपलोड नोंदींची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची गरज आहे.
बातमीचा video ईथे पहा 👇












