रघुनाथ खांडेकर यांची सरकार नियुक्त बेळगावी जिल्हा हिंदू धार्मिक देवस्थान कमिटीवर सदस्यपदी निवड

बेळगाव /प्रतिनिधी
सरकार नियुक्त बेळगावी जिल्हा हिंदू धार्मिक देवस्थान कमिटी, मुजराई इलाखे येथील सदस्यपदी रघुनाथ खांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. बेळगावी ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार तथा माजी महिला व बालविकास मंत्री श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर तसेच कर्नाटक विधानपरिषदेचे सदस्य श्री चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत रघुनाथ खांडेकर यांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.
बेळगावी जिल्ह्यातून एकूण ९ सदस्यांची सरकार नियुक्ती करण्यात आली असून, रघुनाथ खांडेकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर आणि श्री चन्नराज हट्टीहोळी यांनी रघुनाथ खांडेकर यांच्या प्रामाणिकपणा, निष्ठा आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून ही संधी उपलब्ध करून दिली असून, मराठी समाजासाठी ही निवड विशेष अभिमानाची बाब मानली जात आहे.

या निवडीबद्दल रघुनाथ खांडेकर यांनी दोन्ही मान्यवरांचे आभार मानले. धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा, मंदिरांचा विकास तसेच समाजहिताच्या उपक्रमांसाठी कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
हा कार्यक्रम श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गृह कार्यालयात पार पडला. यावेळी काडाचे अध्यक्ष युवराज कदम, उचगाव काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष बाळू देसुरकर, सुरेश इतगी, माजी अध्यक्षा वैशाली खांडेकर, नागेश देसाई, गायत्री पाटील, सचिन बाळेकुंद्री, वामन मेगोचे, महेश पाटील यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.













