बेळगावात १४ ऑक्टोबरला बँक ऑफ इंडियाचा ‘ऋण मेळा’; पात्र अर्जदारांना जागीच कर्जमंजुरी
मोफत सिबिल अहवालासह कर्जाची माहिती; महिला उद्योजक, बेरोजगार तरुण आणि स्टार्टअप्सना विशेष संधी

बेळगाव : बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी बेळगाव येथे ‘ऋण मेळा’ आयोजित करण्यात आला आहे. ‘तुमची स्वप्ने, आमचे वित्त’ (Your Dreams, Our Finance) या संकल्पनेवर आधारित हा मेळा सकाळी १० वाजल्यापासून महावीर भवन, बेळगाव येथे होणार आहे.
या मेळ्याचा विशेष लाभ नव्या पिढीतील तरुण (Gen Z), महिला उद्योजक, बेरोजगार युवक, विविध क्षेत्रांतील व्यावसायिक, स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) मिळणार आहे.
कर्जविषयक मार्गदर्शनासह मोफत सिबिल अहवाल
मेळ्यामध्ये नागरिकांना कर्जासाठीची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, सिबिल गुणांकन सुधारण्याचे उपाय आणि विविध कर्ज योजनांची माहिती दिली जाणार आहे. यासोबतच मोफत सिबिल अहवालाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कर्जासाठी पात्र असलेल्या अर्जदारांना बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मेळ्याच्या ठिकाणीच प्राथमिक तत्त्वावर कर्जमंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना, महिला उद्योजकांना आणि लघुउद्योजकांना आर्थिक सहाय्य मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
उत्तर कर्नाटकात दरमहा दोन ऋण मेळे
उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, आर्थिक विकासाला चालना देणे आणि सर्वसामान्य नागरिकांना सुलभपणे कर्ज उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
बँक ऑफ इंडियाच्या हुबळी-धारवाड विभागीय क्षेत्रांतर्गत उत्तर कर्नाटकात दरमहा दोन ऋण मेळे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे नव्या उद्योगांना आणि व्यवसायविस्तार करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना बँकिंग सुविधांचा लाभ घेता येणार आहे.













