माजी सैनिक मेळाव्यात रोजगाराचा महामेळावा
बेळगाव : द मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर व द मराठा लाइट इन्फंट्री रेकॉर्ड्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी स्टेडियम येथे त्रि-सेवा माजी सैनिक मेळावा व रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला ५,२३० माजी सैनिक, वीर नारी, आश्रित व कुटुंबीयांनी सहभाग घेतला.

बेळगाव प्रतिनिधी : द मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (MARATHA LIRC), बेळगाव आणि द मराठा लाइट इन्फंट्री रेकॉर्ड्स यांच्या संयुक्त विद्यमाने, मुख्यालय दक्षिण भारत क्षेत्र तसेच कर्नाटक व केरळ सब एरियाच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी स्टेडियम येथे त्रि-सेवा माजी सैनिक मेळावा आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. माजी सैनिक, वीर नारी, आश्रित आणि त्यांच्या कुटुंबीयांना विविध शासकीय, लष्करी, आरोग्य, कायदेशीर तसेच रोजगारविषयक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्याने या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ५,२३० माजी सैनिक, वीर नारी, आश्रित आणि कुटुंबीयांनी मेळाव्यात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला कर्नाटक व केरळ सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल भारत मेहतानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. द मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट, ओआयसी रेकॉर्ड्स आणि स्टेशन कमांडर ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश के. एन. शिवकुमार तसेच एअरमन ट्रेनिंग स्कूल, सांबरा येथील कमांडंट एअर कमोडोर सूरज शंकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
दोन ज्येष्ठ माजी सैनिकांचा विशेष गौरव
देशसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दोन ज्येष्ठ माजी सैनिकांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. सुभेदार शांतय्या, SM यांनी द मद्रास रेजिमेंटमध्ये १७ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली. त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धांत सहभाग घेतला होता. त्यांच्या शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांना सेना मेडलने सन्मानित करण्यात आले होते. सन १९७२ मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांनी त्यांचा वैयक्तिक सन्मान केला होता.
याचबरोबर १७/५ मराठा लाईट इन्फंट्रीचे माजी सैनिक सिपाई दत्तू पाटील, वय १०३ वर्षे, यांचाही विशेष गौरव करण्यात आला. त्यांनी १९४३ ते १९४६ या कालावधीत दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करी सेवा बजावली होती. त्यांच्या सेवेसाठी त्यांना १९३९–४५ स्टार, बर्मा स्टार आणि वॉर मेडल प्रदान करण्यात आले होते. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबाचा लष्करी सेवेचा वारसा आज चार पिढ्यांपर्यंत कायम आहे. त्यांचा मुलगा १९ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये, तर नातू आणि पणतू सिग्नल्स कोअरमध्ये सेवेत आहेत.
पेन्शन, SPARSHपासून आरोग्य व कायदेशीर मदतीपर्यंत सुविधा
मेळाव्यात माजी सैनिकांच्या विविध अडचणींचे एकाच ठिकाणी निराकरण करण्यासाठी २१ रेकॉर्ड कार्यालये आणि विविध संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पेन्शन, SPARSH प्रणाली, आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकिंग सेवा तसेच विविध कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन आणि सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय तसेच दंत तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले. विविध कायदेशीर अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कायदेविषयक सल्ल्याची सुविधाही उपलब्ध होती. त्यामुळे अनेक माजी सैनिकांनी आपल्या प्रलंबित समस्या आणि कागदपत्रांशी संबंधित प्रश्न अधिकाऱ्यांसमोर मांडले.
विविध योजनांतून कोट्यवधींचा आर्थिक लाभ
कार्यक्रमादरम्यान बोलताना मेजर जनरल भारत मेहतानी यांनी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. लष्करी सेवा बजावल्यानंतर उद्भवणाऱ्या विविध अडचणींमध्ये माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवेदरम्यान झालेल्या अपंगत्वामुळे सेवेतून बाहेर पडलेल्या १७४ जवानांना सुमारे १३ कोटी रुपयांची मदत, ७९ लष्करी कुटुंबांना सुमारे १.५ कोटी रुपये, तर Post Discharge Claims अंतर्गत तीन हजारांहून अधिक कुटुंबांना सुमारे १७.५ कोटी रुपयांचे आर्थिक लाभ मिळवून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
माजी सैनिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी २४ तास हेल्पलाइन उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच SPARSH, पेन्शन आणि बँकिंगशी संबंधित माहितीचा गैरवापर करून माजी सैनिकांना लक्ष्य करणाऱ्या सायबर फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
२४ कंपन्यांकडून ७२८ रोजगाराच्या संधी
मेळाव्याचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण ठरले ते म्हणजे आयोजित करण्यात आलेला रोजगार मेळावा. या रोजगार मेळाव्यात २४ कंपन्यांनी सहभाग घेत ७२८ रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. या संधींचा लाभ घेण्यासाठी तब्बल १,४७० उमेदवारांनी अर्ज व नोंदणी केली.
माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना लष्करी सेवेनंतर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कौशल्यांचा योग्य वापर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा रोजगार मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता. विविध क्षेत्रातील कंपन्यांच्या सहभागामुळे उमेदवारांना रोजगाराच्या संधींबरोबरच उपलब्ध पर्यायांची माहितीही मिळाली.
वीर नारी, माता व विधवांशी विशेष संवाद
माजी सैनिकांच्या कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वीर नारी, माता आणि विधवांशी विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या माध्यमातून झालेल्या या संवादात कुटुंबीयांच्या दैनंदिन अडचणी, कल्याणकारी योजनांचा लाभ, आवश्यक सुविधा आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमामुळे केवळ माजी सैनिकच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रशासन व लष्करी यंत्रणेशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढवली मेळाव्याची रंगत
मेळाव्यादरम्यान विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. ढोल-ताशा, जॅझ तसेच सिल्व्हर बँडच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. देशसेवेचा अभिमान, माजी सैनिकांप्रती सन्मान आणि कुटुंबीयांचा उत्साह या वातावरणात संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी आवश्यक असलेल्या पेन्शन, आरोग्य, कायदेशीर मदत, तक्रार निवारण, कागदपत्रे आणि रोजगाराच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने हा मेळावा माजी सैनिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.
















